व्यक्तिमत्व

राजकीय वाटचाल

महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलण्याचे श्रेय एकनाथ शिंदे यांना जाते. एक सामान्य कार्यकर्ता ते भारतातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एका राज्याचे मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांनी उत्तुंग प्रगती केली आहे. शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विविध नोकऱ्या केल्या. ७०च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तृत्वाने अनेक युवक ‘शिवसेने’शी जोडले गेले. त्याचवेळी ठाण्याचे आनंद दिघे शिवसेनेमध्ये सामील झाले. ८०च्या दशकात एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या संपर्कात आले आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला राजकीय वळण मिळाले. १९८०च्या दशकात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि लवकरच त्यांची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली.

५८ वर्षीय शिंदे हे २००४, २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग चार वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. शिवसेनेच्या प्रमुख मेळाव्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २०१४मध्ये त्यांच्या विजयानंतर, सर्वात लोकप्रिय नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली. नंतर त्यांनी अल्पकाळ महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. सेना-भाजप सरकारमध्ये त्यांची PWD मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. ३० जून, २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.