बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकणारे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुण्यात झाला. ते महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी आणि व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे ते संस्थापक आणि मुख्य संपादक होते. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व प्रखर होते, त्यांचा आपुलकीचा स्वभाव, आपल्या माणसांवरील प्रेम शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करून महाराष्ट्रातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचे काम केले.
बाळासाहेबांनी सूज्ञपणे आणि दूरदृष्टीने हिंदुत्वाचा मुद्दा ओळखला आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करून आघाडीच्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. १९९५ ते २००० हा काळ शिवसेना-भाजपसाठी सुवर्णकाळ होता. देशात आणि महाराष्ट्रातही सेना-भाजपच्या राजकारणाला जनतेची अभूतपूर्व मते मिळाली.
राज्यात मातोश्री वृद्धाश्रमाची साखळी, वृद्धांसाठी सवलती, झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे, मुंबईतील उड्डाणपूल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अशी अनेक स्वप्ने डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेब महाराष्ट्राच्या सामाजिक आणि भौतिक विकासासाठी कटिबद्ध होते. यातील अनेक योजना कार्यान्वित झाल्या आणि महाराष्ट्राच्या विकासाचे नवे मार्ग खुले झाले.
राजकारणात असे उत्कट आणि आक्रमक विचार मांडणारे बाळासाहेब वैयक्तिक जीवनात अतिशय प्रेमळ आणि कुटुंबाभिमुख होते.