विशेष माहिती

अजित अनंतराव पवार

अजित अनंतराव पवार (२२ जुलै १९५९) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी आहेत. २ जुलै २०२३ पासून ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.[१] २०२२-२३ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले आहे. [२] ते १९९१ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.[३][४] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत. [५][६] २०१९ मध्ये, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु ३ दिवसात दोघांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले.